१६२ मी पणे सगळा वेदु हरपला

मी पणे सगळा वेदु हरपला ।
शास्त्रांचा खुंटला अनुवाद ॥ १ ॥
तें रूप सुंदर कृष्ण नाम सोपार ।
निरालंब गोचर गोकुळींचे ॥ २ ॥
सेविता योगियां सुलभ दुर्गम ।
गौळियां सुगम नाम घेतां ॥ ३ ॥
निवृत्ति निकट कृष्णनामसार ।
पापाचा संचार नाम छेदी ॥ ४ ॥

सरलार्थ:

मीच एक वर्णन करणारा शब्द प्रभु आहे अशा अभिमानी वेद तेथे नाहिसा झाला व शास्त्रांचेहि बोलणे जेथे थांबले ।।१।। सर्वांचा शेवट व स्वावलंबी असे ते सुंदर कृष्णनामाचे रूप जे गोकुळांत चालते बोलते आहे ।।२।। योगीजनांना मात्र नाम घेवून अत्यंत सुलभ आहे ।।३।। निवृत्तिच्या जवळ साररूप श्रीकृष्ण असून त्याचे नामच सर्व पाप समूह नष्ट करून टाकते ।।४।।

भावार्थ:

ज्याचे वर्णन करायला मी पणा न सोडलेले वेद गेले ते तिथेच हरपले तर शास्त्रांना त्याचे वर्णन करता आले नाही. तेच परब्रह्म सुंदर व देखणे सगुण रुप घेऊन कृष्णनाम धारण करुन गोकुळात अवतरले आहे. सर्वत्र व्यापक व सोपे असणारे ते परब्रह्म योग्यांना समजायला अवघड होते व सगुण कृष्णरुपाच्या नामा मुळे त्या गौळ्यांना सोपे झाले आहे. निवृत्तिनाथ म्हणतात, त्या कृष्णनामाच्या प्रभावाने पापाचा समुळ नाश होतो त्याच नामाचा मी निकट आश्रय केला आहे.

Leave a Reply 0

Your email address will not be published. Required fields are marked *