१६५ वोळलें दुभतें सर्वांसि पुरतें
वोळलें दुभतें सर्वांसि पुरतें ।
प्रेमाचें भरतें वैष्णवासी ॥ १ ॥
वोळतील चरणीं वैष्णव गोमटे ।
पुंडलिकपेठें हरि आला ॥ २ ॥
सोपान खेंचर ज्ञानदेव लाठा ।
देताती वैकुंठा क्षेम सदा ॥ ३ ॥
निवृत्तीनें ह्रदयीं पूजिलें तें रूप ।
प्रत्यक्ष स्वरूप विठ्ठलराज ॥ ४ ॥
सरलार्थ:
हे प्रभुप्रेमाचे दुभते सर्वांना पुरून उरेल असे वैष्णवांना झाले आहे ॥१॥ आता हे वैष्णव श्रीहरिच्या पायाजवळ येतील कारण त्या पुंडलिकाच्या बाजारगल्लीत श्रीहरिच आला आहे ।.२ ।। सोपानकाका विसोबा खेचर व सर्वांत मोठा ज्ञानदेव हे वैकुंठस्वरूप श्रीहरिस सदैव आलिंगन देतात ।।३।। ते पांडुरंगाचे रूप निवृत्तिने आपल्या हृदयात पूजले आहे. कारण हा विठूराजा साक्षात् आत्म्याचे स्वरूपच आहे ।।४।।
भावार्थ:
सर्व इच्छा प्राप्त करणारी श्री विठ्ठल नाम कामधेनु सर्व वैष्णवांना मिळाल्याने त्यांना प्रेमाचे भरते आले आहे. संत पुंडलिकामुळे पंढरीपेठेत तो श्री विठ्ठल आल्याने त्याच्या चरणकमलांचा लाभ वैष्णव घेत आहेत. सोपानदेव, विसोबा खेचर व सर्वात मोठा वैष्णव ज्ञानराज हे त्या वैकुंठपीठाला श्री विठ्ठलाला क्षेम देत आहेत. निवृतिनाथ म्हणतात, ज्या रुपाला मी हृदयात पूजले तेच रुप श्री विठ्ठल बनुन प्रत्यक्ष स्वरुपात अवतरले.