१६६ धन्य हा खेचर धन्य हा सोपान
धन्य हा खेचर धन्य हा सोपान ।
भक्तीचें जीवन जनक हेतु ॥ १ ॥
धन्य याचें कूळ पवित्र कुशळ ।
नित्य या गोपाळ जवळी असे ॥ २ ॥
याचेनि स्मरणें नासती दारुणें ।
कैवल्य पावणें ब्रह्मामाजी ॥ ३ ॥
निवृत्ति म्हणे परब्रह्म हें साकार ।
तेथील अंकूर उमटले ॥ ४ ॥
सरलार्थ:
विसोबा खेचर व सोपानदेव हे भक्तिचे जीवन असून भक्तिचा जन्म होण्यासहि तेच कारण आहेत ।।१।। यांचे कुळ धन्य व चतुर आहे. कारण श्रीहरि गोपाळ यांच्या सतत जवळ आहे ।।२।। यांच्या स्मरणानेहि पापांचा नाश होतो व ब्रह्मस्वरूपासह कैवल्य मोक्ष प्राप्त होतो ।।३।। श्रीनिवृत्तिनाथ म्हणतात संत हे आकाराला आलेले परब्रह्मच आहे. त्या परब्रह्माचे ते फुटलेले अंकूरच आहेत ।।४।।
भावार्थ:
सतत केलेल्या भक्ती मुळे त्या भक्तीचे जनकत्वच प्राप्त करुन कृतकृत्य झालेले सोपानदेव व विसोबा खेचर आहेत. ज्यांच्या जवळ तो गोपाळ नामरुपाने सतत असतो त्याचे कुळ पवित्र व कुशळ असते. या संतांचे जे सतत चिंतन करतात त्यांचे दारुण पाप नष्ट होते व ते भगवंताच्या कैवल्यास प्राप्त होतात. निवृतिनाथ म्हणतात, हे संत म्हणजे त्या सगुण साकार परब्रह्माचे अंकुर आहेत.