१७५ सुमनाची लता वृक्षीं उपजली
सुमनाची लता वृक्षीं उपजली ।
ते कोणे घातली भोगावया ॥ १ ॥
तैसा हा पसारा जगडंबर खरा ।
माजि येरझारा शून्यखेपा ॥ २ ॥
नाहीं त्यासि छाया नाहीं त्यासी माया ।
हा वृक्ष छेदावया विंदान करी ॥ ३ ॥
निवृत्तिराज म्हणे गुरुविण न तुटे ।
प्रपंच सपाटे ब्रह्मीं नेम ॥ ४ ॥
सरलार्थ:
फुलांची वेल वृक्षामध्ये-झाडामध्येच उत्पन्न झाली ती त्या वृक्षाच्या सर्वांगावर खेळून त्याचा भोग घेण्यास दुसऱ्या कोणी घातली आहे का ।।१।। तसा या जगाच्या आकाराचा विस्तार व त्यामध्ये होणाऱ्या जन्म-मृत्युच्या खेपा शून्य आहेत म्हणजे नाहीतच ।।२।। हा वृक्ष तोडावयास गेले असता त्याला छायाहि व कांही सत्ताहि नाही असे तो लाघव करतो, चातुर्य दाखवतो ।।३।। निवृत्तिनाथ म्हणतात श्रीगुरुवांचुन हा प्रपंच समूळ नष्ट होऊन, ब्रह्मस्वरूपाची प्राप्ति होणार नाही ।।४।।
भावार्थ:
फुलांच्या वेली शेजारील झाडाचा आधार घेऊन वाढतात मग त्या वेलींच्या फुलांचा सुगंध कोण भोगतो. त्यानुसार जगताचा पसारा हा खरा नाही मायेच्या अधिन आहे म्हणुन मिथ्या आहे. व जीव जन्म व मृत्युच्या येरझारा त्यामध्ये घालत असतो. त्या मायीक वृक्षाकडुन कृपेची छाया मिळु शकत नाही. म्हणुन हा मायिक वृक्ष तोडण्याचा प्रयत्न काहीनी केला. निवृतीनाथ म्हणतात हा मायिक वृक्ष कोणत्याही उपायाने साधनाने तुटत नाही. गुरुकृपा झाली की जीवाला ब्रह्मावस्था प्राप्त होते व तो सहज स्थितीत जातो तरी प्रपंच पसारा उतरत नाही.