१७८ विस्तार हरिचा चराचर जालें
विस्तार हरिचा चराचर जालें ।
त्या माजी सानुलें गुरु दैवत ॥ १ ॥
गुरुविण व्यर्थ विज्ञान न संपडे ।
ज्ञान हेतुकडे हिंडनें व्यर्थ ॥ २ ॥
गुरु परब्रह्म गुरु मात पिता ।
गुरूविण दैवत नाहीं दुजें ॥ ३ ॥
निवृत्ति म्हणे मज गुरु बोध दिठी ।
भक्ति नाम पेटी उघडिली ॥ ४ ॥
सरलार्थ:
हे चराचर विश्व त्या श्रीहरिचाच पसारा आहे व त्यामध्येच हे गुरू गहिनी लहानसे दैवत आहे ।।१।। आपले जीवन हे गुरुविना व्यर्थ आहे. विशेष ज्ञान अनुभव त्यांच्याशिवाय प्राप्त होत नाही. गुरूशिवाय ज्ञानप्राप्तिच्या उद्देशाने भटकणेहि निरर्थक आहे ।।२।। श्रीगुरु हे परब्रह्म स्वरूप असून ते मातापिताहि आहेत. त्यांनीच ही सर्व समता दाखविली आहे ।।३।। निवृत्तिनाथ म्हणतात गुरुबोधाच्या दृष्टिनेच भक्तिची नाम पेटी उघडली आहे ।।४।।
भावार्थ:
त्या हरिचा विस्तार संपुर्ण चराचरा व्यापुन उरलेला आहे त्यामुळे त्या व्यापक स्वरुपापुढे माझे गुरु जरी लहान वाटत असले तरी वापरेल्या दैवत उपाधीने ते ही व्यापकच ठरतात. (अणु रेणु या थोकडा तुका आकाशा येवढा). संसार समजचे विज्ञान गुरुविण कळत नसले व शुध्द ज्ञान जरी झाले तरी त्याचा हेतु हरि झाला नाहीतर ते व्यर्थ ठरते. असे माझे गुरु भाझे माता पिताच आहेत व हेच माझे दैवत आहे दुसरे नाही. निवृतिनाथ म्हणतात, गुरु गहिनीनाथांच्या बोधामुळे मला नामभक्तीची पेटी उघडता आली.