१७९ तुटलें पडळ भेटलें केवळ
तुटलें पडळ भेटलें केवळ ।
सर्व हा गोपाळ गुरुमुखें ॥ १ ॥
न देखों बंधन सर्व जनार्दन ।
व्यासदिकीं खूण सांगितली ॥ २ ॥
ब्रह्मांडविवरण हरिचा हा खेळ ।
त्यांतील हा वेळ तोडियेला ॥ ३ ॥
निवृत्ति बोधला गुरुखुणा बोध ।
मनाचा उद्बोध हरिचरणीं ॥ ४ ॥
सरलार्थ:
गुरूगहिनीच्या मुखातून झालेल्या उपदेशाने व सर्वरूपाने हा श्रीहरि गोपाळ केवळ एकटाच भेटला ।।१।। आता आम्ही संसार बंधन पाहत नाही तर सर्वरूपाने तो जनार्दन दिसत आहे. हेच वर्म पूर्वी व्यासादिक ऋषींनी सांगितले आहे ।।२।। ब्रह्मांडाचा विस्तार हा श्रीहरिचाच खेळ आहे. त्यातील सत्यत्व आभासाचा वेल तोडला आहे. नष्ट केला आहे ।।३।। गुरुगहिनी मार्मिक बोधाने निवृत्तिस यथार्थ बोध झाला व मनास हे हरिच्या चरणांचे उद्बोध-प्रबोधन झाले ।।४।।
भावार्थ:
श्री गुरु गहिनीनाथांच्या मुखात ऐकलेल्या त्या परमात्म्याच्या ज्ञानाच्या बोधामुळे माझे भ्रांतीचे पडळ तुटले व मला आत्मस्वरुपातील भगवंताचे दर्शन झाले. श्री गुरु व्यासानी त्यांच्या ग्रंथात वर्णन केलेले वासुदेवाचे स्वरुप वाचुन आम्हाला त्याला जाणण्याचे कोणतेच बंधन उरले नाही. सर्व ब्रह्मांड ची निर्मिती करणे ही हरिची लिला आहे. व त्याला त्यासाठी वेळेचे बंधन उरले नाही. तो ते निमिशमात्रात करतो. निवृतिनाथ म्हणतात, त्याच्या खुणेचा बोध गुरु गहिनीनानी केल्यामुळे माझे मन त्या हरिचरणावर विनटले आहे.