१८१ आमचा साचार आमचा विचार
आमचा साचार आमचा विचार ।
सर्व हरिहर एकरूप ॥ १ ॥
धन्य माझा भाव गुरूचा उपदेश ।
सर्व ह्रषीकेश दावियेला ॥ २ ॥
हरिवीण दुजे नेणें तो सहजे ।
तया गुरुराजें अर्पियेलें ॥ ३ ॥
हरि हेंचि व्रत हरि हेंचि कथा ।
हरिचिया पंथा मनोभाव ॥ ४ ॥
देहभाव हरि सर्वत्र स्वरूप ।
एक्या जन्में खेप हरिली माझी ॥ ५ ॥
निवृत्ति हरी प्रपंच बोहरी ।
आपुला शरीरीं हरि केला ॥ ६ ॥
सरलार्थ:
आता आमचा आचार विचार एक हरिरूपच असून तोच आम्हाला पुरेसा आहे ।।१।। माझा भाव सद्गुरूंच्या उपदेशावरच असल्याने मी धन्य आहे. कृतार्थ आहे. त्यांनी मला सर्वरूप श्रीहरिचे दर्शन घडविले ।।२।। हरिशिवाय जो दुसरे पाहतच नाही अशी सहजस्थिती ज्यांची आहे त्याच गुरूराजांनी मला हे अर्पण केले ।।३।। हरि हेच ध्येय व हरि हिच ज्याची कथा-बोलणे असुन हरि प्राप्तीच्या मार्गाकडे ज्याचा मनोभाव आहे ।।४।। देहभावात व सर्व ठिकाणी हरिचेच स्वरूप दर्शन घडल्याने माझी या एकाच जन्माने फेरी नाहीशी केली आहे ||५|| श्रीनिवृत्तिनाथ म्हणतात गुरुकुपेने लाभलेला हरि प्रपंचास नाहिसे करून त्याने आपल्या शरीरासहि हरिरूप केले आहे ॥६॥
भावार्थ:
शिव व विष्णु हे दोन्ही एकच आहेत हाच आमचा विचार आहे व हाच आमचा आचार झाला आहे. श्री गुरुच्यां उपदेशावर पुर्ण भाव ठेवल्यामुळे त्यांनी मला त्या हृषीकेशाचे स्वरुप दाखवले आहे. त्यामुळे त्या हरि वाचुन दुसरे काही नाही हे कळल्यामुळे जे काही राहिले ते म्हणजे अज्ञान अविद्या मी श्री गुरु गहिनीना अर्पण करुन मी फक्त त्या हरिरुपालाच विनटलो. हरिच माझे व्रत व कथा झाल्यामुळे त्या हरिच्या पंथाला मी मार्गस्थ झालो. त्यामुळे माझा देहभान गळला व मी हरिरुप असल्याची जाणिव झाली व ह्याच जन्मात माझ्या जन्म मरणांच्या खेपातुन सुटका झाली. निवृतिनाथ म्हणतात देहभावालाच संपवुन हरिरुप दिल्यामुळे माझा प्रपंच ही निरसला. किंवा प्रपंच ही हरिरुप झाला.