१८२ सर्वांघटी वसे तो आम्हां प्रकाशे
सर्वांघटी वसे तो आम्हां प्रकाशे ।
प्रत्यक्ष आम्हां दिसे गुरुकृपा ॥ १ ॥
विरालें ते ध्येय ध्यान गेलें मनीं ।
मनाची उन्मनि एक जाली ॥ २ ॥
ठेला अहंभाव सर्व दिसे देव ।
निःसंदेह भाव नाहीं आम्हां ॥ ३ ॥
निवृत्ति साधन गयनिप्रसादें ।
सर्व हा गोविन्द सांगतुसे ॥ ४ ॥
सरलार्थ:
सर्व शरीरात राहन तो आत्मा सर्वांना ज्ञानप्रकाश देतो तो श्रीगुरुगहिनीकृपेने दिसत आहे ।।१।। आता आमचे ध्येय ध्यान आम्हाला मनात विलीन झाले असून ते मनही उन्मन झाले आहे. उन्मनी अवस्थेत एकरूप झाले आहे ।।२।। आता अभिमान थांबला असून सर्वत्र देवच दिसू लागला आहे. त्यामुळे आम्हास भवसंसार नाही यांत काही संशय नाही सर्व ठिकाणी गोविंद परमात्मा आहे हे सांगणारा श्रीगुरुप्रसाद हेच निवृत्तिचे साधन आहे.।।४।।
भावार्थ:
सर्व शरिरात तो परमात्मा एकत्वाने प्रकाश किंवा चैतन्य रुपाने वसत आहे पण तो फक्त गुरुकृने पाहता येतो. ध्येय ध्याता ध्यान ह्या त्रिपुटीचा निरास त्यानी केल्याने मन उन्मनाची एकच अवस्था झाली किंवा अवस्था लागली. त्या बोधाने अहंभाव गेल्याने सर्वत्र तो परमात्मा पाहता आल्याने माझ्या भावही निसंदेह पणे राहिला नाही.निवृतिनाथ म्हणतात, गहिनीनाथानी नामाचे साधन सांगितल्यामुळे सर्वच त्या गोविदांची स्वरुप आहेत ह्याचे भान झाले.