१८४ पूर्णबोधें धाले आत्मराम धाले
पूर्णबोधें धाले आत्मराम धाले ।
निखळ वोतले पूर्णतत्त्वें ॥ १ ॥
पूर्वपूण्य चोख आम्हांसि सफळ ।
गयनि कल्लोळ तुषार आम्हां ॥ २ ॥
चंद्र सूर्य कीर्ण आकाश प्रावर्ण ।
पृथ्वी अंथुरण सर्वकाळ ॥ ३ ॥
निवृत्ति म्हणे गुरु धडफुडा ।
ब्रह्मांडा एवढा अनंत माझा ॥ ४ ॥
सरलार्थ:
श्रीगुरूप्रसादाने आमचे मन बोधाने पूर्ण तृप्त होऊन आत्मारामच झाले आहे. ते शुद्ध ब्रह्मरूप पूर्ण तत्त्वतेवोतले मूर्त झाले आहे ।।१।। आमचे निर्मळ असे पूर्वपूण्य फळास आले आहे. श्रीगुरू गहिनीच्या कृपा कल्लोळाचे तुषार आम्हास प्राप्त झाले आहे ।।२।। चंद्र-सूर्याच्या किरणासह आकाश हे पांघरूण व पृथ्वीचे अंथरूण आता आम्हास सर्वकाळ लाभले ।।३।। (आकाश मंडप पृथ्वी आसन । रमे तेथे मन क्रिडा करू ।) श्री निवृत्तिनाथ म्हणतात – तो माझा गुरू गहिनी हा चांगला असून सीमारहित ब्रह्मांडाएवढा आहे ॥४॥
भावार्थ:
माझ्या आत्माला गुरुकृपेने पुर्ण बोध झाल्याने मला आत्मरामाचे दर्शन घडले. आमचे पुर्वपुण्य चोख असलाने श्री गुरुनी नामामृत कल्लोळाचे तुशार आम्हावर उडवले.त्यामुळे आम्ही आकाशाचे पांघरुण व पृथ्वीचे आंथरुण करुन चंद्र सुर्याचा प्रकाश सर्वकाळ भोगतो. निवृतिनाथ म्हणतात, गुरु गहिनीनाथ धडफुडा म्हणजे खरे गुरु असल्याने त्या ब्रह्मांडाचे अनंत स्वरुप मला समजले.