१८५ आम्हां जप नाम गुरुखूण सम
आम्हां जप नाम गुरुखूण सम ।
जन वन धाम गुरुचेचि ॥ १ ॥
नेघों कल्पना न चढों वासना ।
एका पूर्णघना शरण जाऊं ॥ २ ॥
तप हें अमूप नलगे संकल्प ।
साधितां संकल्प जवळी असे ॥ ३ ॥
निवृत्ति म्हणे मज निरोपिलें धन ।
हेचि ब्रह्मखुण जाणिजेसु ॥ ४ ॥
सरलार्थ:
आमचा आवडीचा जप राम व गुरूंनी दिलेले वर्म हे दोन्ही सारखे आहेत. जन, वन, स्थान हे श्रीगुरुंनीच व्यापले आहे ।।१।। आम्ही आता जीवशिव कल्पना घेणार नाही व कोणत्या वासनेवरहि आरूढ होणार नाही. एक त्या पूर्ण दाटलेल्या परब्रह्म परमेश्वरासच शरण जाऊ ॥२॥ त्याकरिता मोठे तप किंवा खूप संकल्पहि नकोत वर्म साधले तर तो जवळच अति समीप आहे ।।३।। श्री निवृत्तिनाथ म्हणतात – मला श्रीगुरु गहिनीने जे धन दान दिले तीच ब्रह्माची खूण-रहस्य आहे. असे तुम्ही जाणा ।।४।।
भावार्थ:
आम्हाला नामजपाची खुण गुरु समानच असल्यामुळे आम्हाला हे जन किंवा वन हे श्रीगुरुंचे आहेत असे वाटते. कोणत्याही कल्पनेत न अडकता वासनेला स्वतवर आरुढ न होऊ दिल्यामुळे मला त्या एकमेव पुर्णघन हरिला शरण जाता आले. तो परमात्मा आमच्या जवळ असल्याने आम्हाला साधनेचे संकल्प न करता अमुप तप करता आले.निवृतिनाथ म्हणतात, तो नाम धनाचा ठेवा श्री गुरु गहिनीनाथानी दिल्यामुळे त्या परब्रह्माची खुण आम्हाला समजली.