१९२ पृथ्वी श्रीराम आकाश हें धाम
पृथ्वी श्रीराम आकाश हें धाम ।
आपण विश्राम स्थूलरूपें ॥ १ ॥
सूक्ष्मस्थूल राम साधक परम ।
नाम सर्वोत्तम सर्वारूपीं ॥ २ ॥
आकार विकार सम सारिखाचि हरि ।
बाह्यअभ्यंतरीं आपणचि ॥ ३ ॥
निवृत्ति निष्टंक ज्ञान तें सम्यक् ।
गयनि विवेक सिद्ध पंथ ॥ ४ ॥
सरलार्थ:
गुरु गहिनीकृपेने आता आम्हाला पृथ्वी श्रीरामरूप तर आकाश आपले ठिकाणच झाले आहे (अणोरणिया थोकडा । तुका आकाशाएवढा
।। ) व आपणच आपले एक स्वरूपाने विश्रांती स्थान झालो आहोत ॥१॥ हे स्थूल व सूक्ष्म जगतच श्रेष्ठ अशा रामाचे साधक झाले आहे व सर्वरूपात सर्वोत्तम असे नामच आहे ।।२।। या जगाच्या आकारात व विकारातहि श्रीहरि हा समत्वाने सारखाच आहे. तो आत व बाहेरही आपणच नटला आहे ।।३।। निवृत्तिला निश्चयात्मक व चांगले ज्ञान हा गुरु गहिनीचा विचार आमचा स्वतः सिद्ध असा संप्रदाय आहे ।।४।। (संप्रदाय सिद्धपरंपरेने हा विवेकपूर्ण विचार श्री गुरुगहिनीनाथांद्वारे हे निश्चयात्मक व चांगले ज्ञान निवृत्तिला मिळाले.)
भावार्थ:
आत्माराम रुप पृथ्वी व गृह रुप आकाशात स्थुल रुप घेऊन आपण विश्राम करतो. नामाची साधना हे सर्वोत्तम साधन असुन सुक्ष्म किंवा स्थुल रुपात त्या रामनामाचे साधन करणे उत्तम आहे. सर्वत्र आकार विकाराने भरलेला तो व्यापक परमात्मा सर्व ठायी सम असुन अंतर्बाह्य तोच सर्वत्र भरला आहे. निवृत्तिनाथ म्हणतात, ज्या सिद्धांत ज्ञाना मुळे सम्यक झालेले श्री गुरु गहिनीनाथ विवेक पंथांचे वारकरी झाले आहेत.