१९३ हरिविण न दिसे जनवन आम्हा
हरिविण न दिसे जनवन आम्हा ।
नित्य तें पूर्णिमा सोळाकळी ॥ १ ॥
चन्द्रसूर्यरश्मी न देंखों तारांगणें ।
अवघा हरि होणें हेंचि घेवो ॥ २ ॥
न देखो हे पृथ्वी आकाश पोकळीं ।
भरलासे गोपाळीं दुमदुमीत ॥ ३ ॥
निवृत्ति निष्काम सर्व आत्माराम ।
गयनीचा धाम गूजगम्य ॥ ४ ॥
सरलार्थ:
आता जनात व वनातहि आम्हाला श्रीहरिशिवाय दुसरे कांहीच दिसत नाही ।।१।। पौर्णिमेच्या सोळा कलायुक्त पूर्ण चंद्राप्रमाणे तो परिपूर्ण हरि आम्हाला नित्यच दिसत आहे ।।२।। आता ती चंद्र सूर्याची किरणे व असंख्य तारांगणे आम्ही पाहत नाही. सर्वरूपाने हरि झाला हाच अनुभव घेत आहोत.।।२।। ही पृथ्वी व आकाशाची अवकाशरूप पोकळीहि आम्ही पाहत नाही तर हे सर्व श्रीहरि दुमदुमुन भरला आहे.।।३।। सर्वच आत्माराम झाल्याने निवृत्ति सहजच निष्काम झाला आहे. “किमिच्छन् कस्य कामाय।” अशी त्याची स्थिती झाली आहे गहिनीकडूनच हे धाम स्थान कळले आहे. ।।४।।
भावार्थ:
पोर्णिमेचा पुर्ण चंद्र अंगात 16 कळा घेऊन त्या सर्वाना जसा व्यापुन असतो तसे जन वन सर्वकाही हरिने व्यापले आहे. त्याच्या शिवाय आम्हाला काही दिसत नाही. संपूर्ण जगत व्यापलेल्या हरिमुळे आम्ही चंद्र सुर्य रश्मी तारांगणे पाहात नाही तिथे ही त्या हरिलाच पाहतो. आकाश व पृथ्वी ह्यातील पोकळी पासुन पृथ्वीला ही आम्ही हरिरुपात पाहतो. निवृत्तिनाथ म्हणतात श्री गुरु गहिनीनाथ त्यांच्या गुह्य स्थानातील निरंजनी घरात राहतात व त्या मुळे मी निष्काम होऊन त्याला पाहायचा प्रयत्न करतो.