१९४ स्वरूप साजणी निद्रिस्त निजलें
स्वरूप साजणी निद्रिस्त निजलें ।
भलें चेतविलें गुरुरायें ॥ १ ॥
सावध सावध स्मरे रे गोविंद ।
अवघा परमानंद दुमदुमित ॥ २ ॥
निद्रेचिया भुलीं स्वरूपविसरू ।
प्रकाशला थोरु आत्मारम ॥ ३ ॥
निवृतिदेवो आनंद झालिया ।
लवति बाहिया स्वस्वरूपीं ॥ ४ ॥
सरलार्थ:
अग सखे साजणी, बाई मी स्वस्वरूप विस्मरन रूप निद्रेत निजले असता श्रीगुरुगहिनीनाथांनी मला सावध-जागे करून बरे केले ।।१।। अरे जागा होऊन सावधपणाने गोविंद स्मरण कर त्याप्रमाणे श्रीहरिस्मरणाचे परिणामी सर्वत्र व्यापक परमानंदानुभूती झाली ।।२।। स्वस्वरूप विस्मृतीच्या या झोपेमुळे मला पडलेला विसर त्याने नाहिसा होऊन व्यापक, श्रेष्ठ आत्माराम स्वरूप ज्ञान प्रगट व विस्तारीत झाले ।।३।। अद्वैत आत्मानंदातच भक्तिसुखाचा उपभोग घ्यायला लागलो. डावा डोळा लवणे, उद्दीपित होणे व उजवा बाहु स्पुरणे. इ शुभशकुन श्रीहरिच्या भेटीच्या आनंदाने निवृत्तिनाथांना होऊ लागले. ।।४।।
भावार्थ:
आत्मस्वरुप मैत्रिणी मला श्री गुरु गहिनीनाथानी आत्मस्वरुपाची ओळख करवुन मला माया पटलातुन जागे केले. त्यांनी मला सावध हो सावध हो म्हणत त्या गोविंदाचे स्मरण करत सर्व जगतात भरुन उरलेला परमानंद प्राप्त करुन दिला. अज्ञानाच्या निद्रेत मला स्वरुपाची भुल पडली पण आत्मज्ञानाचा प्रकाश पडला व मी सावध झालो. निवृत्तिनाथ म्हणतात, दोन्ही बाह्या स्वस्वरुप आनंदाने स्पुरुन आल्या आहेत त्या मुळे त्या आत्मारामाला आलिंगन देऊन मी आनंद प्राप्त करत आहे.