१९७ एक देव आहे हा भाव पैं सोपा ।
एक देव आहे हा भाव पैं सोपा ।
द्वैतरूप बापा पडसी नरकीं ॥ १ ॥
द्वैत सांडी अद्वैत धरी ।
एक घरोघरी हरी नांदे ॥ २ ॥
सबाह्य कोंदलें परिपूर्ण विश्वीं ।
तोचि अर्जुनासि दुष्ट जाला ॥ ३ ॥
गयनि प्रसादें निवृत्ति बोधु ।
अवघाचि गोविंदु अवध्य रूपीं ॥ ४ ॥
सरलार्थ:
बाबा! सर्वाभूती एकच देव आहे हा विचार सोपा असून द्वैत दृष्टिने नरकांत पडावे लागेल ।।१।। तू द्वैत टाकून अद्वैत भावनेचा स्विकार कर, कारण प्रत्येक वस्तुमध्ये एक श्रीहरिच नांदत आहे ।।२।। बाह्य जगतासह आंत श्रीहरिचे परिपूर्ण स्वरूपच सर्व विश्वात कोंदुन भरले आहे हेच दर्शन अर्जुनाला विश्वरूप दर्शनात झाले आहे ।।३।। गुरुगहिनीच्या प्रसादाने निवृत्तिस बोध होऊन सर्वरुपाने सर्वत्र गोविंदच दिसू लागला आहे ।।४।।
भावार्थ:
जर एकात्म देव आहे तत्व मानले नाही व त्यात द्वैत पाहिले तर नरकाला जावे लागेल. तेंव्हा आपल्यामध्ये असलेले द्वैत टाकले की सर्व घरा मध्ये तो हरिच राहत आहे ही भावना दृढ होते. अर्जुनाचा साह्यकारी म्हणुन दिसणारी तो श्रीकृष्ण सर्व विश्वात ओतप्रोत भरला आहे. निवृत्तिनाथ म्हणतात, श्री गुरु गहिनीनाथांच्या कृपे मुळे सर्व रुपात त्या गोविंदाला मी पाहात आहे.