२०३ म्हणवितो नंदाचा बाळ यशोदेचा
म्हणवितो नंदाचा बाळ यशोदेचा ।
आपण चौवाचातीत कृष्ण ॥ १ ॥
शब्दासि नातुडे बुद्धिसि सांकडें ।
तो सप्रेमें आतुडे स्मरतां नाम ॥ २ ॥
उपचाराच्या कोटी न पाहे परवडी ।
तों प्रेमळाची घोडी धोई अंगें ॥ ३ ॥
निवृत्तिचें तप फळलें अमुप ।
गयनिराजें दीप उजळिला ॥ ४ ॥
सरलार्थ:
मी नंदयशोदेचा बाळ आहे असे श्रीकृष्ण म्हणवतो खरा पण तो चारहि वाणीच्या पलिकडे आहे. (परा, पश्यन्ती, मध्यमा, वैखरी या चार वाचा आहेत) ।।१।। शब्दात तर तो सापडतच नाही पण बुद्धिला कळण्याची अडचण आहे. तो प्रेमाने नामस्मरण केले असता हाती येतो ॥२॥ कोट्यावधि उपचाराचे प्रकार केले तरी तो त्याकडे पाहतहि नाही तो प्रेमळ भक्तांचे घोडे स्वतः अंगानेच धुतो ।।३।। निवृत्तिचे तप अमाप रुपांत फलद्रुप झाले आहे. गुरू गहिनीराजांनी तो दिवा उजळिला- प्रकाशित केला आहे ॥४॥
भावार्थ:
नंद व यशोदेचा मुलगा म्हणवुन घेणारा तो श्रीकृष्णाचे वर्णन करणे चारी वाणीना ही शक्य नाही. त्या श्रीहरिचे प्रेमाने नाव घेतले तर तो साकार होतो नाहीतर बुध्दीला तो सापडत नाही शब्दात सांगता येत नाही. कोटी उपचार केले तरी त्यांना तो जाणत नाही पण भक्ताच्या प्रेमासाठी त्याचे घोडे ही धुतो. निवृत्तिनाथ म्हणतात, श्री गुरु गहिनीनाथानी ज्ञानदीप उजळल्यामुळे व मागचे तप असल्यामुळे तो फलद्रुप झाला.