२०६ बुद्धि बोध नाहीं क्षमारूप सर्व
बुद्धि बोध नाहीं क्षमारूप सर्व ।
तेथे देहभाव अर्पियेला ॥ १ ॥
नाही काळ वेळ नाहीं तो नियम ।
सर्व यम नेम बुडोनि ठेले ॥ २ ॥
हरिरूप सर्व गयनि प्रसादे ।
सर्व हा गोविन्द आम्हां दिसे ॥ ३ ॥
निवृत्ति सफळ गयनि वोळला ।
सर्वकाळ जाहला हरिरूप ॥ ४ ॥
सरलार्थ:
ज्या ठिकाणी बुद्धिचा बोध नाहिसा होतो व सर्व क्षमारूप असते तेथे मी माझा देहभाव समर्पण केला आहे ।।१।। आता मला काळवेळ व नियमहि राहिले नाही. यमनियमादि सर्व नाहिसे झाले आहे ॥२॥ (निस्त्रैगुण्ये पथि विचरतां को विधि को निषेधः ।) गुरु गहिनींच्या प्रसादाने सर्व जग हरिरूप झाले असून आम्हाला आता सर्व ठिकाणी श्रीहरि गोविंदच दिसत आहे ।।३।। तो गुरुगहिनी प्राप्त झाल्याने निवृत्तिचे जीवन सफल झाले आहे व आता भूत-भविष्य-वर्तमान हा सर्वकाळ हरिरूपच झाला आहे ॥४॥
भावार्थ:
त्याचा अंगीकार केला की बुध्दीला त्याच्या शिवाय बोध नसतो व द्वैतभावच राहात नाही म्हणून सर्वत्र क्षमा तो देऊ लागतो म्हणजेच देहभाव त्याला अर्पण झाला असे समजते. त्याच्याशी एकरुप झाले की मग काळ वेळ यांची गणती गौण होते. सर्व यमनियम, नेम तोच होऊन जातात.गहिनीनाथांच्या कृपेने ती अवस्था लाभल्या मुळे मी हरिरुप झालो सर्वत्र गोविंदच दिसु लागला. निवृत्तिनाथ म्हणतात, गहिनीनाथांच्या सफळ अनुग्रहामुळे सर्व काळ माझ्या साठी हरिरुप पावते झाले.