२०९ सौजन्य समाधान सर्व जनार्दन
सौजन्य समाधान सर्व जनार्दन ।
आम्हां रूपेंधन इतुके पुरें ॥ १ ॥
गोपाळ माधव कृष्णरूपें सर्व ।
ब्रह्मपद देव सकळ आम्हां ॥ २ ॥
द्वैतभाव भावो अद्वैत उपावो ।
सर्व ब्रह्म देवो एक ध्यावो ॥ ३ ॥
निवृत्तीचा भावो सर्व आत्मा रावो ।
हरि हा अनुभवो वेदमतें ॥ ४ ॥
सरलार्थ:
जनार्दनाचे सर्वस्वी सहाय्य हेच समाधान असून ते आत्मज्ञान रूप धन एवढेच आम्हाला अगदी पुरेसे आहे ।।१।। गोपाळ, माधव, कृष्ण यारूपे आम्हास सर्वदेवरूप हे ब्रह्माच्याच स्थानी आहे ॥ २॥ द्वैत भावाची कल्पना करून अद्वैताच्या साधनाने सर्व ब्रह्मरूप देवाचेच आम्ही ध्यान करतो ।।३।। सर्व आत्मराज हाच राजा आहे असा निवृत्तिचा मनोभाव आहे व वेदाच्याहि मताने सर्वव्यापक हरि असाच अनुभव आहे ॥४॥
भावार्थ:
जगतातील सर्व रुपे आम्ही जनार्दन रुपातच पाहतो त्यामुळे आम्हाला समाधान लाभते व सर्वांबरोबर आम्ही सौजन्याने पाहतो हेच आमचे धन पुरेसे आहे. कधी तो गोपाळ तर की माधव तर कधी कृष्ण होतो पण आम्ही त्याच्यात ब्रह्मपणच पाहातो. आमच्या द्वैतभावाचा पूर्ण निरास होऊन आम्ही अद्वैतात त्याला एकत्वाने ब्रह्मस्वरुपात जाणतो. निवृत्तिनाथ म्हणतात, माझा भाव त्याच्याशी एकरुप झाल्याने तो आत्माराम सर्वत्र एकरुपात मी पाहतो व वेदांचा ही त्या हरिरुपाबद्दलच तेच मत आहे.