२१० मातेचें बाळक पित्याचें जनक

मातेचें बाळक पित्याचें जनक ।
गोत हें सम्यक हरि आम्हां ॥ १ ॥
मुकुंद केशव हाचि नित्य भाव ।
हरि रूप सावेव कृष्ण सखा ॥ २ ॥
पूर्वज परंपरा तें धन अपारा ।
दिनाचा सोयिरा केशिराज ॥ ३ ॥
निवृत्तीचे गोत कृष्ण नामें तृप्त ।
आनंदाचें चित्त कृष्णनामें ॥ ४ ॥

सरलार्थ:

बाळ हे मातापितृत्वाचे जनक असते. तसे आम्हाला हा श्रीहरि चांगले गोत झाला आहे ॥१॥ मुकुंद, केशव हाच आमचा नित्य मनोभाव असून हे सावयव हरिचे रूप-हाच कृष्ण आमचा सखा आहे ॥२॥ पूर्वजांच्या परंपरे पासून हे अमाप धन आम्हास लाभले आहे हा केशिराज श्रीहरि दिनांच्या सोयरा आहे ।।३।। निवृत्तिगणगोत हे कृष्ण नामाने तृप्त असून कृष्णनामाने चित्त आनंदमय झाले आहे ।।४।।

भावार्थ:

पिता मुलांचा जन्म देणारा व माता त्या बालकाचे पालनपोषण करणारी असते ती दोघ ही हरिरुप असुन सर्व गोत्रज आम्हाला हरिरुपच भासतात. मुकुंद, केशव जरी म्हंटले तरी तो आम्हाला हरिरुपच आहे. त्याच हरिरुपात तो कृष्ण म्हणुन ही दिसतो.आमच्या पुर्वजांची परंपरा हेच आमचे अपार धन असुन केशीराजाचे चिंतन हीच आमची परंपरा आहे. निवृत्तिनाथ म्हणतात, कृष्णनामाने तृप्त झालेले आमचे गोत्रज आहेत त्यामुळे कृष्णनामाचा आनंद चित्तात भरुन उरला आहे.

Leave a Reply 0

Your email address will not be published. Required fields are marked *