२११ विश्रामीचा श्रम आश्रम पैं नेम
विश्रामीचा श्रम आश्रम पैं नेम ।
जप हा परम आत्मलिंगीं ॥ १ ॥
निवृत्ति घन दाट कृष्णरूपें आम्हा ।
अखंड पूर्णिमा नंदाघरीं ॥ २ ॥
निवृत्तिचित्ताची गेली लगबग ।
केला अनुराग कृष्णरूपीं ॥ ३ ॥
निवृत्ति धारणा कृष्णनाम सार ।
सर्वत्र आचार हरिहरि ॥ ४ ॥
सरलार्थ:
विसाव्याचाहि विसावा व आश्रमाचाहि नेम असा हा कृष्णनाम जप उत्कृष्ट असून ती आत्म्याची खूण आहे ।।१।। या कृष्णरूपाने आम्हाला भरभरीत असे वैकुंठच लाभले असून नंदाच्या घरी सदैव पोर्णिमेचा कृष्णचंद्र नांदत आहे ।।२।। निवृत्तिच्या चित्ताचा चंचलपणा संपूर्ण गेला आहे व कृष्ण स्वरूपावर त्याने पूर्णप्रेम केले आहे ।।३।। सार स्वरूप असे कृष्णाचे नाम हीच निवृत्तिच्या चित्ताची धारणा आहे व हरि हरि हा नामोच्चार हा त्याचा सर्व ठिकाणचा आचारधर्म होऊन बसला आहे. ।।४।।
भावार्थ:
ब्रह्मचर्य, गृहस्थ, वानप्रस्थ व संन्यास ह्या चारी आश्रमात झालेला श्रम आत्मलिंगाच्या जपाने निवृत होतो व शाश्वत आराम प्राप्त होतो. मला ते आत्मलिंग सर्वत्र कृष्णरुपाने ओतप्रोत भरल्याचे दिसत आहे. जसा पौर्णिमेच्या पूर्णचंद्रासारखा त्याच्या उदय नंदाघरी झाला आहे. त्याला तशा रुपात पाहण्याने माझ्या चित्ताची लगबग निवृत झाली व ता कृष्णरुपाचा मी अनुराग केला. निवृत्तिनाथ म्हणतात, ते कृष्णनामाची धारणा मला झाल्यामुळे तो हरिरुपाने सर्वत्र मला जाणवत आहे.