२१२ तिहींचे त्रिगुणें रजतममिश्रित
तिहींचे त्रिगुणें रजतममिश्रित ।
त्यामाजि त्वरित जन्म माझा ॥ १ ॥
सर्व पुण्य चोख आचरलों आम्हीं ।
तरिच ये जन्मीं भक्ति आम्हां ॥ २ ॥
शांति क्षमा दया निवृत्ति माउली ।
अखंड साउली कांसवदृष्टि ॥ ३ ॥
निवृत्ति म्हणे तेंचि गा जीवन मोल ।
भिवरा विठ्ठल दैवत आम्हां ॥ ४ ॥
सरलार्थ:
स्थूल सूक्ष्म व कारण अशा देहत्रयाचा, सत्वरज तम अशा गुण यांत लगोलग जीवांना जन्म घ्यावा लागतो ॥१॥ मात्र आम्ही सर्व चोख निर्मळ पुण्याचे आचरण केल्याने या जन्मात आम्हांस भक्तिचा लाभ झाला ।।२।। शान्ति, क्षमा, दया व वृत्तिशून्य माऊली आई तिची कासव दृष्टिने आम्हावर साऊली आहे ।।३।। श्रीनिवृत्ति म्हणतात तेच आमच्या जीवनाचे मोल आहे. भिवरातिरावरील विठ्ठल हे आमचे दैवत आहे ।।४॥
भावार्थ:
माझा जन्म सत्व, रज, तम ह्या तिन्ही गुणांच्या मुळे त्याच्या इच्छेने लवकर झाला. आम्ही निष्काम पुण्याई मुळे ह्या जन्मी भक्ती करायला आधिकारी झालो. कासवी जशी प्रेमपान्हा नजरेतुन पाजुन पिले जगवते तसे शांती दया क्षमा देऊन त्याने मला जगवले. निवृत्तिनाथ म्हणतात, त्या भिवरे काठच्या विठुमाऊली मुळे आमच्या जीवनाला मोल आले.