२१५ त्रैलोक्य पावन जनीं जनार्दन
त्रैलोक्य पावन जनीं जनार्दन ।
त्यामाजि परिपूर्ण आत्मज्योति ॥ १ ॥
नाहीं आम्हां काळ नाहीं आम्हा वेळ ।
अखंड सोज्वळ हरि दिसे ॥ १ ॥
ब्रह्म सनातन ब्रह्मीचे अंकुर ।
भक्तिपुरस्कार भूतें रया ॥ ३ ॥
निवृत्ति म्हणे दीन दुबळ मी एक ।
मनोमय चोख आम्हां गोड ॥ ४ ॥
सरलार्थ:
हा जनी जनार्दनच त्र्यैलोक्यास पवित्र करीत असून त्याच्यामध्ये तो आत्मप्रकाशाने परिपूर्ण आहे. ।।१।। त्यामुळे आम्हाला काळ वेळ अशी कांहीच नाही. अति लखलखित प्रकाशासह हरिच दिसतो ।।२।। सनातन- शाश्वत ब्रह्म व त्याचाच अंकुर भक्तियुक्त होऊन भूतमात्रांच्या दयेने तो साकार झाला आहे निवृत्तिनाथ म्हणतात- मी दुर्बळ असून एक दीन आहे. शुद्ध मनोभावच आम्हाला आवडणारा आहे ।।४।।
भावार्थ:
स्वर्ग, मृत्यू व पाताळ ह्या तिन्ही लोकांत तो जनार्दन परिपूर्ण आत्मज्योत घेऊन त्रैलोकाला पावन करतो. आम्हाला काळ वेळेचे बंधन नाही अखंडपणे त्या सोज्वळ हरिचे सानिध्य असते. जे भक्त जीवदशेत त्याचा पुरस्कार करतात ते ब्रह्मदशेचे कोंब होतात. निवृत्तिनाथ म्हणतात मी एक दीन दुबळा मनोगत सांगतो आहे. ते मनात घर करून राहिलेले स्वरुप शाश्वत आहे व ते आम्हाला आवडते.