२१७ कल्पना कोंडूनि मन हें मारिलें
कल्पना कोंडूनि मन हें मारिलें ।
जीवन चोरिले सत्रावीचें ॥ १ ॥
साजीव सोलीव निवृत्तिची ठेव ।
कृष्ण हाचि देव ह्रदयीं पूजी ॥ २ ॥
विलास विकृति नाहीपै आवाप्ति ।
साधनाची युक्ति हारपली ॥ ३ ॥
निवृत्ति कारण योगियांचे ह्रदयीं ।
सर्व हरि पाही दिसे आम्हां ॥ ४ ॥
सरलार्थ:
कल्पनेला डांबुन मनास मारले व सतरावी जीवनकला जी कुंडलिनी तिचा जिव्हाळाच चोरून घेतला ।।१।। सुंदर व शुद्ध अशी निवृत्तिची ठेवणीची वस्तु जो श्रीकृष्ण देव तोच हृदयात सदैव पुजित आहोत ।।२।। तेथे विलास, विकार व अप्राप्ति-प्राप्ति हे कांहीच नसून साधनाची युक्तिहि नाहीसी झाली आहे ।।३।। निवृत्तिचे साध्य योग्यांच्या हृदयात असून तो श्रीहरिच आम्हाला सर्व रूपाने दिसत आहे. हे तुम्ही समजून घ्या ।।४।।
भावार्थ:
शंकारुपी कल्पनेला मी मनासकट काढून टाकल्या मुळे लिंगदेहाची सतरावी जीवनकला तोच आत्मा आहे. तोच आत्माराम चोरला, साजीव सोलीव असणारा कृष्ण तोच माझा ठेवा आहे. त्याचीच पूजा मी हृदयात करतो. त्यासाठी कोणत्याही साधनाची गरज राहात नाही त्या मुळे विलास विकृती यांची व्याप्ती उरली नाही. निवृत्तिनाथ म्हणतात, जो परमात्मा योग्यांचे कारण आहे तोच मला जगात सर्वत्र दिसतो.