२१८ नामरूप सोय नाहीं जया रूपा
नामरूप सोय नाहीं जया रूपा ।
तेंथिलये कृपा खेळों आम्हीं ॥ १ ॥
आम्हां हेंचि रूप अद्वैत स्वरूप ।
नाहीं तेथें किं लाभ कल्पनेचा ॥ २ ॥
ध्येय ध्यान खुंटे प्रपंच आटे ।
नाम हें वैकुंठा नेतु असे ॥ ३ ॥
निवृत्ति साधन वृत्तिच संपन्न ।
नाम हें जीवन अच्युताचें ॥ ४ ॥
सरलार्थ:
ज्या स्वरूपास नाम व रूपाचा संबंधच नाही त्या स्वरूपांत आम्ही श्रीगुरूकृपेने खेळत आहोत ।।१।। अद्वैत स्वरूप हेच आमचे ईश्वर रूप आहे. तेथे कल्पनेचा खेळ मुळीच नाही ।।२।। तेथे ध्येय, ध्यान ध्याता ही त्रिपुटि थांबते व प्रपंच आटून जातो व त्याचे नामच वैकुंठास घेवून जाते ।।३।। आत्माकार वृत्तिचा लाभ हेच निवृत्तिचे साधन आहे व अच्युत श्रीहरिचे नाम हेच आमचे जीवन आहे ॥४॥
भावार्थ:
त्याला नामा नाही रुप नाही जो निर्गुण आहे त्या ब्रह्मस्वरुपाच्या कृपेमुळे आम्ही जगतात खेळताना दिसतो. आमच्या साठी हे अद्वैत स्वरुपच महत्वाचे आहे. त्यामुळे मनाला कल्पनेप्रमाणे जाता येत नाही. ह्या नामाचा जप केला ध्येय ध्यान हे जागीच मुरडुन जाते व वैकुंठाची वाट सोपी होते. निवृत्तिनाथ म्हणतात, त्या नामसाधनेचा परिपाठ ठेवला तर आपले जीवनच अच्युतमय होते.