२१९ कल्पितें कल्पिलें चित्त आकळिलें
कल्पितें कल्पिलें चित्त आकळिलें ।
तन्मय घोळिलें चैतन्याचें ॥ १ ॥
सांग माये कैसें कल्पिलें कायसे ।
सर्व ह्रषीकेश दिसे आम्हां ॥ २ ॥
निवृत्ति समरस सर्व ह्रषीकेश ।
ब्रह्मींचा समरस कल्पने माजी ॥ ३ ॥
सरलार्थ:
कल्पना करणारे कल्पित चित्त आवरून चैतन्यात एकरूप करून घोळले ॥१॥ अग बाई तूच सांग कशी व काय कल्पना करावी ? कारण कल्पना करतांनाच आम्हाला सर्वरुपाने श्रीहरिच दिसतो ।।२।। निवृत्ति हा सर्व ऋषीकेश – श्रीहरित समरस एकरूप झाला आहे व आम्हाला आता कल्पनेचा लेशहि उरला नाही ।।३।।
भावार्थ:
मायिक संसाराच्या कल्पनेपासुन आपले मन काढुन घेतले की आत्मारामरुप चैतन्याचा प्रवेश मनात होतो. हे माये तु ह्या संसाराबद्दल काय कल्पना केली आहेस. पण आता तो हृषीकेशच आम्हाला सर्वत्र दिसत आहे. निवृत्तिनाथ म्हणतात, आमची कल्पनाच ब्रह्रस्वरुपाशी समरस झाल्याने आम्ही सर्वभावे त्या हृषीकेशाशी समरस झालो.