२२० नाहीं जनीं विजनीं विज्ञानीं
नाहीं जनीं विजनीं विज्ञानीं ।
निर्गुण काहाणीं आम्हां घरीं ॥ १ ॥
सुलभ हरि दुर्लभ हरि ।
नांदे माजघरी आमचीये ॥ २ ॥
आनंदे सोहळा उन्मनीचि कळा ।
नामचि जिव्हाळा जिव्हे सदा ॥ ३ ॥
निवृत्ति देवीं धरिली निर्गुणीं ।
शांति हे संपूर्णी हरीप्रेमें ॥ ४ ॥
सरलार्थ:
निर्गुणाची गोष्ट आमच्या जना वनांत व विशेष ज्ञानातहि आमच्या घरी जीवनांत नाही ।।१।। आमुचा सगुण श्रीहरि सुलभ कि दुर्लभ जसा असेल तसा आमच्या माजघरांत-आतल्या शेज घरात नांदत आहे ।।२।। आनंदाचा सोहळा जी उन्मनीची कला-युक्ती असे नाम सदैव आमच्या जिभेचा जिव्हाळा झाला आहे ।।३।। निवृत्ति देवाच्या साधन राज्यात इंद्रियांची बाहिर्मुख प्रवृत्ति नष्ट झाली आहे ॥४॥
भावार्थ:
ज्या गोष्टी जनामध्ये वनामध्ये व प्रपंचाच्या ज्ञानात नाहीत त्या निर्गुण कहाण्या आमच्या घरात आहेत. जरी तो परमात्मा सुलभ मानला किंवा दुर्लभ मानला कसाही मानला तरी तो आम्हा सोबत आमच्या घरी आहे. आमच्या जिव्हेला त्याच्या नामाचा छंद लागल्या मुळे आम्ही सतत आनंदी व उन्मनी अवस्थेत सुख भोगत आहोत. निवृत्तिनाथ म्हणतात, त्या निर्गुण हरिला प्रेमाने आम्ही हृदयात धरल्यामुळे आम्हाला सख्त शांती प्राप्त होते.