२२२ सजीव साजिरी निर्गुण गोजिरी
सजीव साजिरी निर्गुण गोजिरी ।
नांदे माजघरीं आत्माराजु ॥१॥
सदाचार आम्हां नित्य हरिप्रेमा ।
नेणो मनोधर्मा प्रपंचिया ।।२।।
नित्य पैं सोंवळा अखंड पै निर्मळा ।
झणी बारा सोळा म्हणाल तया ।।३।।
निवृत्ति देवीं कलिका पै अमूप ।
विश्वीं विश्वरूप दावीतसे ॥४॥
सरलार्थ:
जीवासह साजणारी व त्रिगुणाने शोभणारी स्थिती असा आमचा आत्माराम अगदी मध्यभागात हृदयाच्याही पलिकडे नांदत आहे ।।१।। नित्य श्रीहरिचे प्रेम हाच आमचा सदाचार झाला आहे. आता प्रपंचाचे मनोरथहि आम्ही जाणत नाही ।।२।। नित्य सोवळा व अखंडपणे निर्मळ अशा त्या आत्मारामास तुम्ही बारा सोळा अशुद्ध म्हणू नका. ।।३।। निवृत्तिची हि अमाप ज्योत विश्वातच विश्वरूप दाखवीत आहे ।।४।।