२२३ देहाच्या देऊळी राउळ निद्रिस्त
देहाच्या देऊळी राउळ निद्रिस्त ।
मायेचे अनुचित भुलि वेशी ॥१॥
चेतवला आत्मा अचेत पै हरि ।
कर्म भरोवरि खुंटलें रया ।।२।।
भ्रांत माया सदा पै वैरिणी ।
मारुनी जीवनी जीव ठेवी ॥ ३ ॥
निवृत्ति अमर आत्माचि साचार ।
माया देवीं घर ब्रह्म केलें ॥ ४ ॥
सरलार्थ:
शरीराच्या मंदिरात देहराज आत्मा झोपलेला आहे. हे मायेचे भुलविणे – फसविणे अनुचित अयोग्य आहे ।।१।। तो निद्रिस्त श्रीहरि आत्मा आता जागा झाला असून कर्माचा जोर खुंटला – थांबला आहे ।।२।। भ्रमात पाडणारी ही माया सदाचीच वैरिणी – शत्रु ती जीवनात जीवाला मारून ठेवते ।।३।। निवृत्ति हा खरोखर अमर आत्माच आहे. कारण आत्मा मायेनेच आपले घर ब्रह्मच केले आहे. माया ब्रह्मरूप झाली आहे. अध्यस्त हे अधिष्ठान रूपच असते. आता तो भासलेला सर्प दोरच झाला आहे ॥४॥