२२४ सृष्टिच्या संमता-सुरतरू तरू
सृष्टिच्या संमता-सुरतरू तरू ।
बोलिला विस्तारु धर्मशास्त्रीं ॥१॥
नेघों हे तरु प्रपंच परिवारु ।
प्रत्यक्ष ईश्वरु पुरें आम्हां ।।२।।
निवृत्ति निवांत हरीच सेवीत ।
दोअक्षरीं उचित इंद्रियासी ॥३॥
सरलार्थ:
सृष्टि सम्मत असा हा कल्पवृक्षच वृक्ष आहे. धर्मशास्त्रात हा विस्तार सांगितला आहे ।।१।। आम्ही मात्र हा वृक्ष व त्याचा विस्तार प्रापंचिक परिवार पसारा आता मनावर घेत नाही. प्रत्यक्ष साक्षात् परमेश्वरच आम्हाला पुरेसा आहे. ।।२।। निवृत्ति हा शांतपणे हरिचाच उपभोग घेत आहे. व या दोन अक्षरांचे “हरि” सेवनच इंद्रियांना उचित- योग्य आहे ।।३।।