२५८ भवसागर सार तरणोपाव सोपा
भवसागर सार तरणोपाव सोपा । कृष्णनाम खेपा हरती जना ॥ १ ॥
रामकृष्ण मंत्र जनासि उद्धार । आणिक साचार मार्ग नाहीं ॥ २ ॥
निष्काम कल्पना आधी साधी मना । ऐक समीरणा हेंचि करी ॥ ३ ॥
निवृत्ति धारणा गुरुचरणा खुणा । ब्रह्माड या खुणा गुरुकृपा ॥ ४ ॥
सरलार्थ:
अरे बाबा संसार समुद्राचे सार व तरून जाण्याचा सोपा मार्ग कृष्ण नाम असून त्याने जन्ममरण खेपा नाहिशा होतात. ।। १ ।। रामकृष्ण हा मंत्रच जनाकरीतां उध्दाराचा मार्ग आहे. दुसरा कोणताच मार्ग सत्य नाही. ॥२॥ निष्कामतेची कल्पना अगोदर साध्य कर ऐक्याची चांगली प्रेरणा हेच कर ।। ३।। गुरूचरणाची खूण-वर्म हेच निवृत्तिचे ध्येय हे ब्रह्मांडहि गुरुकृपेने तीच खूण आहे ॥४॥