२६१ राम नाम मुखी तो एक संसार
राम नाम मुखी तो एक संसार । येऱ्हवी अघोर नरक रया ।। १ ।।
संसार नरक रामनाम सार । तरले पामर पतित देखा ।। २ ।।
अजामेळ नामें तरला पतित । नारायण त्वरित आलें तेथे ।। ३ ।।
हरिनाम हेंचि शास्त्र पै जयाचें । तयासि यमाचें भय नाहीं ॥। ४ ॥
उघडा मंत्र मार्ग गोविंद स्मरणें । रामनामकीर्तनें मोक्षपद ।। ५ ।।
निवृत्ति संचीत रामनाममहिमा । अवघिच पौर्णिमा हरिपाठें ॥ ६ ॥
सरलार्थ:
मुखात रामनाम हाच खरा संसार असून त्यावाचून अघोर नरकच आहे || १ || राम नाम मुखात असणे व नसणे हेच स्वर्ग व नरकाचे सार आहे. याने कित्येक पापी व पामर जीव तरूण गेले ॥२॥ अजामेळा सारखा पापीही तरूण गेला. त्याने नारायण म्हणून मुलास हाक मारली प्रत्यक्ष नारायण श्रीहरि तेथे (त्याचक्षणी) धावून आला ||३|| हरिनामस्मरण हे ज्याचे शास्त्र आहे त्याला मृत्युचे-यमाचे भय नाही ||४|| गोविंदाचे रामनामाचे स्मरण हा उघडा मंत्र असून मोक्षाचा मार्ग आहे. त्या रामनामाच्या संकीर्तनानेच मोक्षपदाची प्राप्ति होते. ॥५॥ निवृत्तिने हा राम नामाचा महिमा हृदयांत साठविला आहे. त्यामुळे सोळा कलांनी युक्त संपूर्ण पौर्णिमाच झाली आहे. ।।६।।