२६३ राम नाम जप समत्वे साधावा
राम नाम जप समत्वे साधावा । अहंकार टाकावा अहंबुद्धी ।। १ ।।
सुटसी रे नामें आपेंआप संभ्रसे । नित्य नाम नेमें जपतु जाये ॥ २ ॥
देवेविण नाहीं सर्व शास्त्र बोले । हरिरुपीं बोधले तेचि धन्य ॥ ३ ॥
सुखावरी सुख निसंग रे आचरे । केशव निर्धारिं तुष्टे सदा ।। ४ ।।
निवृत्ति म्हणे पुण्य होईल अगाध । एकनामें गोविंद तुष्टे सदां ॥ ५ ॥
सरलार्थ:
रामनामाचा जप समबुध्दिने साध्य करावा व अहंबुध्दि चा अहंकार टाकून द्यावा. ।।१।। रामनामाने तु आपोआप माया मोहातून सुटशील तू नित्यनेमाने नाम जपत जा ।।२।। देवाविण दुसरे काहीच नाही. असे सर्वच शास्त्रे सांगतात. हरि रूपांत ज्याना ज्ञान झाले तेच धन्य आहेत||३|| तू निःसंग होऊन सुखावरच सुखाचे आचरण कर म्हणजे श्रीहरी केशव निश्चयाने सदैव सन्तुष्ट होईल ।।४।। एका गोविंदाच्या नामाने नेहमी तृप्तता व अपार पुण्य प्राप्त होईल असे निवृत्तिनाथ सोगतात ।।५।।