२६५ पुंडलिक सुख सांगता अशेख
पुंडलिक सुख सांगता अशेख । दिनकाळ देख कोंदाटला ।। १ ।।
तें रूप सेविता मुनीजन साधु । विठ्ठल नामें कंदु तुटे जना ॥ २ ॥
नित्यता कीर्तन तुटेल बंधन । आत्माराम घन तुष्टेल जना ॥ ३ ॥
विवेक वैराग्य ज्ञानाचें सौभाग्य । नित्यता आरोग्य हरि सेवी ॥ ४ ॥
पर्वणीचें सार विठ्ठल उच्चार । नित्यता आचार विठ्ठल नामें ॥ ५ ॥
निवृत्ति घनदाट विठ्ठलनाम पेठ । नित्यता वैकुंठ पंढरी ये ॥ ६ ॥
सरलार्थ:
पुंडलिकाचे सर्वसुख सांगतांना दिनरात्र आनंदरूपाने कोंडून भरला आहे. ते विठ्ठलरूप संत साधु मुनी सेवन करतात. ॥। १॥ विठ्ठल नामाने त्यांच्या संसाराचे मूळच तुटून गेले ।।२।। त्याचे नित्य कीर्तन केल्याने संसार बंधन नाहिसे होईल व तो घनदाट भरलेला आत्माराम सन्तुष्ट होईल ।।३।। विवेक व वैराग्य हे ज्ञानाचे सौभाग्य व स्वात्मसुखाचे नित्य आरोग्य या हरिनामाने प्राप्त होते. ।।४।। विठ्ठलनामाचा उच्चार व नित्य आचार हा सर्व पर्वकालाचे सार आहे ।। ५ ।। निवृत्ति म्हणतात विठ्ठल नामाची घनदाट बाजारपेठ पंढरी असल्याने ती नित्य वैकुंठरूपच आहे ।।६।।