२६६ हरिविण चित्ती न धरी विपरीत
हरिविण चित्ती न धरी विपरीत । तरताति पतित रामनामें ।। १ ।।
विचारुनी पाहा ग्रंथ हे अवघे । जेथे तेथें सांगे रामनाम ।। २ ।।
व्यासादिक भले रामनाम पाठी । नित्यता वैकुंठी तया घर ॥ ३ ॥
शुकादिक मुनि विरक्त संसारी । रामनाम निर्धारीं उच्चारिलें ॥ ४ ॥
चोरटा वाल्मीक रामनामीं रत । तोही एक सरत रामनामीं ।। ५ ।।
निवृत्ती साचार रामनामी दृढा । अवघेचि दिन- गूढ उगविली ॥ ६ ॥
सरलार्थ:
तू श्रीहरी शिवाय दुसरे काहीच चित्तात ठेवू नकोस. या रामाच्या नावाने पापी लोकहि उध्दरून जातात. ।। १ ।। सर्व ग्रंथ शोधून पाहा जिथे तिथे हे रामनामच सांगितले आहे. ।।२।। या राम नाम पठण-चिंतनाने व्यासदिक हे चांगले श्रेष्ठ झाले आहेत. त्यांना नित्य वैकुंठातच जागा मिळाली आहे. ।।३।। रामनामाच्या निश्चयाने उच्चार केल्यानेच शुकादिक मुनि संसारात वैराग्यवान झाले आहे. ।।४।। चोरटा वाल्या कोळी राम नामांत रंगल्याने तोहि साधुपदास पात्र झाला आहे. ॥ ५॥ निवृत्ति ही खरोखर राम नामात दृढ असून त्यामुळे सर्वच गुह्य प्रगट झाले आहे ।।६।।