२६७ सर्वाभूती दया शांती पै निर्धारी
सर्वाभूती दया शांती पै निर्धारी । तो योगी साचार जनीं इये ॥ १ ॥
नलगे मुंडणे काया हे दंडणें । अखंड कीर्तनें स्मरे हरि ॥ २ ॥
शिव जाणें जीवीं क्षरला चैतन्य । हें जीवीं कारुण्य सदाभावी ॥ ३ ॥
गगनीं सूर्य तपे अनंत तारा लोपे । एकुचि स्वरुपें आत्मा तैसा ॥। ४ ॥
उगवला कळीं उल्हासु कमळीं । तैसा तो मंडळी चंद्र देखा ।। ५ ।।
निवृत्ति मंडळ अमृत सकळ । घेतलें रसाळ हरिनाम ॥ ६ ॥
सरलार्थ:
सर्वभूत मात्रावर दया असून शान्तिचा निश्चय आहे. तोच या जगात खरा योगी आहे. ।।१।। त्यासाठी मस्तकाचे मुण्डण व देहाचे दण्डण हे कांही लागत नाही. फक्त नित्य-कीर्तनात हरि स्मरण करीत राहा ।। २ ।। जीव म्हणजे साकार चैतन्यच आहे. हे शिव-शंकर जाणतो. म्हणून जीवावर सदैव करुणा करतो ||३|| आकाशांत सूर्य तापला म्हणजे सर्व तारांगणे लोपून जातात. तसा एक आत्मा स्वरूपाने प्रगट झाला. असतां सर्व अनात्म वस्तुंचा लोप होतो ।।४।। आपल्या कलेने आकाशात चंद्र उगवला असता कमळांचा विकास होतो. तसाच प्रकार आत्म ॥५॥ साक्षात्कारात होतो ।। ५ ।। निवृत्तिचा सर्व परिवार हा सर्व अमृतमय आहे कारण आनंदमय असे त्याने हरिनाम घेतले आहे. ॥६॥