२७५ मोक्षाचेनि देठे मोहपाश गिळी
मोक्षाचेनि देठे मोहपाश गिळी । कैसेनि गोपाळीं सत्ता होय ॥ १ ॥
मोहाचें मोहन चिंतिता श्रीहरि । बहिजु भीतरीं अवघा होय ॥ २ ॥
दिननिशीं नाम जपतां श्रीहरिचें । मग या मोहांचें मोहन नाहीं ॥ ३ ॥
निवृत्ति आगम मोहन साधन । सर्व नारायण एकतत्त्वें ॥ ४ ॥
सरलार्थ:
मोक्षाच्या जिज्ञासेनेच मोहपाश गिळला जातो. गोपाळ श्रीहरिची सत्ता – प्राप्ती कशी होईल अशी चिंता जरि चित्तात वाहिली ॥१॥ व मोहालाहि मोहून टाकणाऱ्या श्रीहरि विठ्ठलाचे चिन्तन केले असता तो बाहेर व आंतहि सर्व रूपाने होऊन जातो. ।।२।। श्रीहरिचे नाम रात्रंदिवस जपले असतां मोहाचे मोहन टाकणे उरत नाही. ।। ३।। मोहनाशाचे साधन नामच आहे. हे निवृत्तिचे शास्त्र आहे. एका नामतत्त्वाने सर्व नारायण स्वरूपच होते ||४||