२७८ नामामृत पिक हेचि घेई सुख
नामामृत पिक हेचि घेई सुख । न लगती शोक जन्ममृत्यूचे ॥ १ ॥
रामनामकथा साधि का परमार्था । पावसील पै हिता नाम घेतां ॥ २ ॥
विश्व हें पैं अंध मायेचें विशद । नेणें अर्थभेद तरुणोपाय ॥ ३ ॥
निवृत्ति म्हणे रूप तें प्रकाशले दीप । पंढरिसमीप भीमातीरीं ॥ ४ ॥
सरलार्थ:
नामामृताचे पिक हेच सुख तू घे मग जन्ममृत्युचा शोक तुला होणार नाही ।।१।। रामनाम कथा हाच परमार्थ तू साधून घे कारण ते नाम घेताच तुझे कल्याण होईल ।।२।। सर्वविश्व हे मूर्तिमंत माया असून अज्ञानांध जीव त्या मायेचा आशय व तरून जाण्याचा उपाय जाणत नाही.।।३।। त्या अंधारातून वाट दिसण्यासाठी पंढरिक्षेत्रांत चंद्रभागेच्या तिरावर श्री विठ्ठलाच्या रूपाने एक दिवाच प्रकाशीत झाला आहे असे निवृत्तिनाथ म्हणतात. ॥ ४ ॥