२८५ हरिमार्ग सार येणेचि तरिजे
हरिमार्ग सार येणेचि तरिजे । येऱ्हवीं उमजे संसार रया ।। १ ॥
जपतां श्रीहरि मोक्ष नांदे नित्य । तरले पै सत्य हरिनामें ॥ २ ॥
ओखद रामनाम अमृत । हरिनामें तृप्त करी रया ।। ३ ।।
निवृत्ति साचार हरिनाम जपतु । नित्य हृदयांत हरी हरी ॥ ४ ॥
सरलार्थ:
अरे राजा संसारातून तरण्याचा हरिनाम हा एकच मार्ग असून दुसरी साधने-मार्ग हा संसारच समजावा ।।१।। श्रीहरिचा जप केला असतां नित्य मोक्षाची प्राप्ति होते. या हरिनामानेच अनंतजन तरून गेले हे सत्य आहे. ||२|| अरे राजा रामनाम हे अमृतरूप औषध आहे. त्याने सहजच तृप्ति होते । । ३ । । निवृत्ति हे सत्य हरिनाम जपत असून त्याच्या हृदयात नित्य श्रीहरिचा वास आहे ॥४॥