२८७ देहाच्या दीपकी एक वस्तु चोख
देहाच्या दीपकी एक वस्तु चोख । असोनियां शोक कां करितोसी ।। १ ।।
देहभरि आत्मा नांदे निरंतर । असतां हा विचार कां धांवतोसी ॥ २ ।।
तुझें तूं पाही आहे तें घेई । एकरूप होई गुरुखुणें ॥ ३ ॥
निवृत्तिचें सार हरिरुप सदा । नित्य परमानंदा रतलासे ॥ ४ ॥
सरलार्थ:
देहाच्या दिव्यात एक निर्मळ वस्तू असतांना तू शोक का करतोस ||१|| आत्मा हा देहाला व्यापून निरंतर नांदत असतानाही त्याच्या विचाराने का धांवत आहेस ।।२।। तुझे स्वरूप तू पाहा व आहे तेच घे व गुरुकृपेने-खुणेने त्या परमात्मस्वरूपाशी एकरूप होऊन जा ।। ३।। सदैव हरिस्वरूप हेच निवृत्तिचे सार-ध्येय आहे. व तो नित्य परमानंदात रमला आहे. रंगून गेला आहे ।।४।।