२९२ दुजियांची निंदा दुजेपण सदा
दुजियांची निंदा दुजेपण सदा । द्वैत ते गोविंदा नावडे रया ।। १ ।।
दुजेपणा भिन्न सर्व जनार्दन । ब्रह्म सनातन पावसी रया ॥ २ ॥
वाया द्वैतभाव दुजीया छळणें । ब्रह्म हे येसणें ठाव नेदी ॥। ३ ।।
निवृत्ति म्हणे तो नर येथें गुंफला । द्वैताचा गोंविला मोतिमाळें ॥। ४ ॥
सरलार्थ:
अरे बाबा? दुसऱ्याची निंदा करून सदैव दुजेपणा केल्याने ते द्वैत देवाला आवडत नाही. ।। १ ।। द्वैताला दूर सारत सर्व जनार्दनच आहे. असे मानले तर तुला शाश्वत परब्रह्माची प्राप्ति होईल ।। २।। द्वैत भावनेने व्यर्थच दुसऱ्यास छळणे या मुळे ते अद्वैत ब्रह्म एवढे जवळ असूनहि जागा देत नाही. ||३|| निवृत्तिनाथ म्हणतात – तो मनुष्य यांत गुंतला आहे जो द्वैताच्या कारणमालेत सापडला आहे ।।४।।