२९४ आपपरशून्य आपी करी लीन
आपपरशून्य आपी करी लीन । आपपर जाण हरि असे ।। १ ।।
करितां उपाधि द्वैत ते उपजे । तया अधोक्षजे नुद्धरिजे ॥ २ ॥
दुजिया सौजन्य दुजेपण सांडी । अद्वैत पैं मांडी सुखगोष्टी ।। ३ ।।
निवृत्ति साकार परासि अद्वैत । परे परमामृत गोपवेषें ॥ ४ ॥
सरलार्थ:
आपला व परकेपणा हा नाहिसा करून तू आत्मस्वरूपीच विलीन हो. ॥१॥ कारण आपले व परके हे दोन्हीहि हरिरूपच आहेत असे समज उपाधी केली असता द्वैतच उत्पन्न होते व त्याचा उद्धार परमात्मा करीत नाही. ।।२।। दुसऱ्यास सहाय्य करून द्वैत टाकावे व अद्वैताच्या सुख देणाऱ्या गोष्टी कराव्यात ।।३|| निवृत्तिने द्वैताबरोबर अद्वैत साकार केले व परेसह महान असे अमृत गोपवेषाने श्रीकृष्णरूपाने नटले आहे हे अनुभवले ।।४।।