२९७ कल्पना मासोळी भवजाळ जळी
कल्पना मासोळी भवजाळ जळी । पाशाचिये जाळीं गुंतताहे ॥ १ ॥
मायाजाळ गोंवी भवसिंधु दावी । मन हैं माधवीं गोवी जना ॥ २ ॥
विषयांचे पोखणे पाहा तेथे शून्य । झणीं हे तूं मन जाऊ देसी ।। ३ ।।
निवृत्ति साधन मन हें अनावर । गुरुचरणीं थार बिढार घरी ॥ ४॥
सरलार्थ:
मायामोहजाळाच्या पाण्यात जीव कल्पना ही मासोळी बंधनाच्या जाळ्यात गुंतली आहे ।। १ ।। ही जीव कल्पना मायाजाळांत गुंतवून संसार समुद्र दाखवीत आहे. अरे बाबा तू मन हे माधवाच्या ठिकाणी गुंतून ठेव ।।२।। विषयसुखाची पुष्टता पाहु गेले असता तेथे शून्यच शिल्लक राहते. तेथे तुझे मन जाईल तर जाऊ देऊ नको. ।।३।। निवृत्तिनाथ म्हणतात – तू मनाला आवरणे हेच साधन कर त्याकरिता श्रीगुरूंच्या चरणाजवळ स्थिर करून तेथेच राहा बिढार – बिऱ्हाड कर ॥४॥