२९८ भवार्णव हेतु काय सांगो मातु
भवार्णव हेतु काय सांगो मातु । कल्पना हे तंतु छेदीयेला ।। १ ।।
नाहीं आम्हां ठावो नाहीं आम्हां गांवो । वासना संदेहो बुझालासे ।। २ ।।
मनाचे सुमन वाचे नारायण । जनीं जनार्दन यया हेतु ।। ३ ।।
निवृत्ति निरोपण ब्रह्म हें साधन । गुरुकृपा खुण हिता आली ॥ ४ ॥
सरलार्थ:
संसारसमुद्राचे कारण जी कल्पना तिची गोष्ट काय सांगावी तो कल्पनेचा धागा आम्ही तोडून टाकला ।।१।। आता आम्हाला गांव ठाव ठिकाणा कांही नाही व वासनेचा संशयहि समाप्त झाला आहे । २।। मनाचे चांगले मन करण्यासाठी हरिचे पाय हेच ठिकाण आहे. त्यासाठी सर्व जनात जनार्दन हीच भावना कारणीभूत आहे. ।।३।। निवृत्तिनाथ म्हणतात – ब्रह्म हेच साधन सांगितले असून गुरुकृपेनेच हे हित साध्य झाले आहे ॥४॥