२९९ आगम निगम सर्व सर्वोत्तम
आगम निगम सर्व सर्वोत्तम । दिननिशीं राम सेवीतसें ।। १ ।।
आत्मा गोड हरि आम्हां चाड धरी । अरिते संहारितो आम्हां माजी ।। २ ।।
नेघो हरिविण दुजे ते पै भिन्न । सांगितली खूण गुरुराजें ।। ३ ।।
निवृत्ति गयनि प्रसाद उन्मनी । निरंतर ध्यानीं रामराम ॥ ४ ॥
सरलार्थ:
वेद शास्त्र प्रतिपाद्य सर्वच सर्वाहून उत्तम असा राम दिवसरात्र आम्ही सेवीत आहोत. त्याचे सुख भोगत आहोत ।।१।। आत्मरूप हरि हाच गोड असून त्याची इच्छा आम्ही करीत आहोत. सर्वत्र भरलेले त्यांचा आम्हामध्ये साठा करून ठेवत आहोत ।। २।। एका हरिवांचुन भिन्न असे दुसरे आम्ही काहीच घेत नाही हे वर्म आमच्या श्रीगुरूंनी आम्हास सांगितले आहे || ३ || निवृत्तिला गहिणीने उन्मनी हा प्रसाद दिला आहे. त्याच्या ध्यानी मनी अखंड राम नाम आहे ।।४।।