३११ कल्पना काजळी कल्पिले कवळी
कल्पना काजळी कल्पिले कवळी । कैसेनि जवळी देवो होय ॥ १ ॥
टाकी हे कल्पना दुरित वासना । अद्वैत नारायणा भजे कारें ।। २ ।।
मोहाच्या जीवनीं नको करु पर्वणी । चिंती कां आसनीं नारायण ॥ ३ ॥
निवृत्ति अरुवारु कृष्ण नाम पै सारु । कल्पना साचारु हरि जाला ॥ ४ ॥
सरलार्थ:
कल्पनेच्या काजळीने कल्पित वस्तुलाच आवळुन धरले तर देव कसा जवळचा होईल ।।१।। दुरितवासना व कल्पना तू टाकून दे व अद्वैतस्वरूप नारायणाचे भजन ।।२।। मोहात्मक संसारी जीवन पर्वणी करू नको. तर एका आसनावर बसून नारायणाचे चिंतन कर ।।३।। निवृत्तिस श्रीकृष्ण नाम हेच सुंदर सार असून त्याचा कल्पनात्मक जीवहि हरिरूप झाला आहे ॥४॥