३१४ गगनी अभ्र चाले चंद्र असे निश्चल
गगनी अभ्र चाले चंद्र असे निश्चल । पृथ्वीतळीं बाळ चाले म्हणे ॥ १ ॥
भ्रमाचे भुलीव आलेंसे पडळ । प्रत्यक्ष कवळ डोळियांसी ॥ २ ॥
असें तें न दिसे नसे ते आभासे । विषयाच्या विषें घारलेसे ॥ ३ ॥
निवृत्ति कवळ भ्रमाचा सांडिला । अखंड ध्यायिला हृषीकेश ॥ ४ ॥
सरलार्थ:
आकाशात मेघ चालत असता चंद्र निश्चल असतो मात्र पृथ्वी वरचे बाळ त्यास चंद्र चालतो असे म्हणते ।। १ ।। अशी भ्रमाची भूल केवळ अज्ञानाचा पडदा डोळ्यावर आल्याने होते || २ || आहे ते दिसत नाही व नाही ते भासते विषयांचे विष चढल्याने हा प्रकार घडतो ।।३।। निवृत्तिने हा भ्रमाचा घास उगळून टाकला व अखंड श्रीहरि ऋषिकेशाचे ध्यान केले ॥ ४ ॥