३१५ मोक्षमुक्ति चारी एकतत्त्व हरि
मोक्षमुक्ति चारी एकतत्त्व हरि । बहिजु भीतरी हरि करी ।। १ ।।
तराल स्वभावें एकाएक देवें। एक हरी भावे ऐसा कीजे ॥ २ ॥
टाका हे पैं द्वैत अद्वैत सिद्धांत । मोक्ष मार्ग हेत एकातत्त्वें ।। ३ ।।
निवृत्तिचा मार्ग एक रुपें सांग। नाहीं पै पांग कल्पनेचा ॥ ४ ॥
सरलार्थ:
आंत बाहेर भरलेल्या एकतत्त्वरूप हरि चार मुक्ति करतो ||१|| एकीएक देवाच्या योगाने आपण आपोआपच तराल मात्र सर्वत्र हरिच आहे असा भाव करा ||२|| हे द्वैत टाकून अद्वैताचा सिद्धांत हाच मोक्षमार्गास एक तत्त्वाने कारण आहे. ||३|| निवृत्तिचा मार्ग एकरूपतेनेच पूर्ण आहे. तेथे कल्पनेचा शीण नाही ॥४॥