३१७ ज्ञानाचिया गोष्टी सांगतो चावटी
ज्ञानाचिया गोष्टी सांगतो चावटी । भाव नाहीं पोटीं काय करुं ॥ १ ॥
भावबळें देव भावबळें देव । भक्तीचा सद्भाव पाहतुसे ।। २ ।।
जना उपदेशी विश्वीं हृषिकेशी । आपण भक्तींसीं दुहावित ।। ३ ।।
निवृत्ति म्हणे ज्ञान असे हे सकळ । तेथे अद्वैत कृपाळ बिंबतसे ॥ ४॥
सरलार्थ:
ज्ञानाच्या चावटगोष्टी करतो हे खरे पण अंतरात तो भाव नाही याला काय करू? ||१|| खरे तर देव हा भावाच्याच बळाने आकळती, भक्तिची शक्तीच अशी आहे ||२|| जनांत देव आहे असा जनास उपदेश करतो व आपण मात्र त्या भक्तिभावापासून दूर राहतो ||३|| निवृत्तिनाथ म्हणतात हा व्यापक भाव जेथे फलद्रूप होतो तेथे तो अद्वैतस्वरूप गोपाळ प्रगट होतो ||४||