३१९ समता वर्तावी अहंता खंडावी
समता वर्तावी अहंता खंडावी । तेणेचि पदवी मोक्षमार्ग ।। १ ।।
क्षमा धरी चित्ती अखंड श्रीपति । एकतत्त्व चित्तीं ध्याईजेसु ॥ २ ॥
नाम हाचि मंत्र नित्य नाम सार। दुसरा विचार घेऊ नको ।। ३ ।।
अन्य शास्त्रें भजतां नाहीं पै मुक्तता । हरिनाम गांता मुक्ति रोकडीं ।। ४ ।।
नित्य सुख घ्यावें नामचि अनुभवावें । तरीच सुख पावे इहलोकीं ॥५॥
निवृत्ति भजन नित्य अनुष्ठान । एक रुपै ध्यान मन ध्यातु सदा ।। ६ ।।
सरलार्थ:
समत्वाने वागावे व अहंपणा नाहिसा व्हावा त्यानेच मोक्षमार्गाची पदवी प्राप्त होईल || १|| क्षमास्वरूप लक्ष्मीपतीस अखंड चित्तात घर व एकतत्त्व श्री हरिचेच चित्तात ध्यान कर ।। २।। नाम हाच मंत्र नित्यसार आहे दुसरा विचार घेवूच नको ।।३।। अन्य शास्त्रांचे भजन केल्याने मुक्ति मिळणार नाही, हरिनामाने मात्र ती प्रत्यक्षच प्राप्त होते ।।४।। नाम घेवूनच नित्य सुखाचा अनुभव घ्यावा तरच या इहलोकी सुख लाभेल ||५|| निवृत्तिनाथ म्हणतात – नित्य अनुष्ठान हेच भजन व एका रूपाचे मनामध्ये ध्यान सदैव धरावे ।।६।।