३२२ भेदूनि ब्रह्मांड आणियेली कळा
भेदूनि ब्रह्मांड आणियेली कळा । नित्यता सोहळा हरिप्रेमें ।। १ ।।
हरि धरा चित्तीं मन मारा मुक्ती । प्रपंचसमाप्ति हरिपाठे ॥ २ ॥
विश्रांतीशी स्थान आसनीं शयनीं । हरिध्यानपर्वणी पुरे आम्हां ।। ३ ।।
निवृत्तिसागर हरिरुप नित्य । सेविला तो सत्य दो अक्षरीं ॥ ४ ॥
सरलार्थ:
ब्रह्मांडाचा भेद करून जे ब्रह्मस्वरूपाचे तेज आणले आहे तेच हरिचे प्रेम नित्याचा सोहळा होऊन बसले आहे ||१|| मनाला मुक्तिमध्ये नाहीसे करून चित्तात हरिची मूर्ति धरा त्या हरिस्मरणाने प्रापंचिक दुःखाची समाप्ति होईल. ।। २।। जागृतीत बसले असता व निद्राप्रसंगीहि श्रीहरिच्या ध्यानाचा पर्वकळ हेच आमचे विश्रांन्तिचे ठिकाण आहे. व ते आम्हाला आहे ||३|| निवृत्तिने तो नित्य हरिरूप सागर दोन अक्षरांनीच सेवन केला आहे (हरि ही दोन अक्षरे) अगस्ति ऋषीने एका आचमनात समुद्र प्राशन केला तसे आम्ही हरि या दोन अक्षराचेच पान करून हा सारा समुद्र आटून टाकला ॥४॥