३२६ परंपरा भक्त उद्धरिले प्रेमे
परंपरा भक्त उद्धरिले प्रेमे । सांडिलें दुर्गम सांसारिक ।। १ ।।
नसतें भवभय होते जें मानसी । स्मरतां नाम त्यासी नाहीं केलें ।। २ ।।
पाहतां तुझे नामरूप दृश्य नोहे । तो भक्तांलागी होय कृष्णठसा ||३||
निवृत्तिचे नाम रूप निराकार । कृष्ण हा साचार गयनिकृपा ॥ ४ ॥
सरलार्थ:
परंपराप्राप्त भक्त या श्रीहरि प्रेमाने तरले असून दुस्तर संसारातून मुक्त झाले ||१|| मनामध्ये जे नसलेले संसाराचे भय अकारण होते ते नामाच्या स्मरणाने नाहिसे झाले ।।२।। तुझे नाम रूप पाहिले तर दिसत नाही तो भक्तासाठी राम कृष्णादि रूपाने रूपनाम युक्त होतो ||३|| निवृत्तिनाथ म्हणतात – भगवंत नामरूपातीतच आहे. पण गहिनी कृपेने तो कृष्णाकार झाला हे खरे आहे ।।४।।